Saturday, January 13, 2018

गोष्ट एका हरवलेल्या शहराची

पुणे-मुंबईत कधी गंगाखेडचं कोणी भेटलं तर तुमची पहिली चर्चा कशावर होते? समोर तिऱ्हाईत व्यक्ती कुठल्या दुसऱ्या शहरातली असेल तर? गंगाखेडची मस्करी करून मोकळे होता का तुम्ही? असं असेल तर एकदा पुन्हा विचार करायची वेळ आली आहे. 

    जोहान्स क्वाक त्यांच्या पुस्तकात (Disenchanting India) असाच उल्लेख करतात गंगाखेडचा. इथे यज्ञ होतात पाऊस आणण्यासाठी आणि ५० पैशांच्या भांडवलावर साधू लोक १३ लाख ५० हजार रुपये कमाई करून निघून जातात. इतक्या भोळ्या बाबड्या लोकांचं शहर म्हणून त्यांनी गंगाखेडला संबोधलंय. इसवी सन १२७० पासून ज्या शहराबाबतच्या गोष्टी लोकांना ज्ञात असतील अथवा लिखित असतील त्या शहराला काही इथल्या नागरिकांच्या मनात काहीच किंमत नाही. १८५७ च्या उठावात गोदाकाठी कॅप्टन मुर्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत स्थानिकांच्या लढाईचा कुठला तरी उल्लेखही मी वाचलाय. पण तिकडे कानडोळे करत कला आणि संस्कृतीला बाजूला सारत आपण नेत्यांच्या चर्चा करण्यातच वेळ घातलाय. 
       आर्ट आणि लिटरेचर ने जगाच्या पाठीवर अनेक शहरे मोठी केली. ज्या शहरांचा विकासाशी काही संबंध नसला असता अगदी ती शहरे आज चकाकून उठली आहेत. लोकांचं मन लागावं असं काहीतरी उभारण्यावर तिथल्या स्थानिकांनी अथवा डेव्हलपर लोकांनी भर दिली. त्यामुळे जे घडलं ते शहराला खूप पुढे घेऊन गेलं. महाबळेश्वर जवळील पुस्तकांच्या गावाबद्धल ऐकलंय तुम्ही? सध्या कल्पनेने ते गाव आज विकासाच्या मार्गी लागलंय. 

    गंगाखेड शहराबाबत सांगण्यासारखं किंवा इथं दाखवण्यासारखं काही नाहीये हि भावना बनत चालली गेली. आपल्या इथल्या शाळा पेक्षा परभणी, नांदेड आणि लातूरकडे विद्यार्थ्यांचा कल राहिला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावावर त्यांना फक्त गॅदरिंग आणि २६ जानेवारी वाला क्रीडा महोत्सव इतकंच देऊन आपणच ते घडू दिलंय. स्थलांतर करणारे परिवार जातांना दुकानदारांचं जे काही नुकसान होत आहे त्याचं कारण स्वतःपुरती चालणारी बाजापेठ देखील आहेच. त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदार आपण आहोत. वर्गणी (पट्टी) गोळा करतांना त्या व्यापाऱ्यांना वर्षात किती वेळा देणग्या द्याव्या लागतात याचा आपण कधीच विचार केला नाही. वर्षातून रविवार वगळता २०-२५ दिवस बंद राहणारी कसली हि बाजारपेठ? 
     आपण आपलं शहर कुठेतरी हरवून टाकलंय. दसऱ्याला मानपानाची गर्दी आणि फ्लेक्स पाहायला आपण लहानपणी जायचो नाही. तिथे भेळ पाणीपुरी इत्यादी खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना स्वतःला तिथे व्यापार नकोसा वाटतोय त्याचं कारण आपणच नाही का? या शहरातली घाण काढण्यासाठी आणलेली घंटागाडी पाहून अनेक वर्षं झाली. त्यावर इतके षंड आपणच राहिलो. या शहराची अस्मिता हरवलीय ती आपल्याच निष्काळजीपणामुळे. 
 ५० हजार लोकसंख्येचं शहर आज धुळीत आहे. 'रोम वासन्ट बिल्ट इन अ डे' असं का म्हणतात ते लक्षात घ्या. गंगाखेडकर आहे हे म्हणण्यात/ सांगण्यात अभिमान बाळगा. तसं करता यावं यासाठी प्रयत्नशील रहा! गंगाखेड पुन्हा उभारायची मानसिकता ठेवा. 
जय हिंद!

No comments:

Post a Comment